बहादूर गड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव होते. पण अधिकृत नव्हते त्याचे नाव पांडे पेडगावचा भुईकोट आहे. 25 मे 2008 ला इतिहास प्रेमी व संभाजी भक्तांनी या गडाचे नाव धर्मवीर गड असे नामकरण केले आहे. छत्रपती संभाजीराजांच्या ज्वलंत धर्मनिष्ठेचा साक्षीदार पेडगाव चा किल्ला धर्मवीर गड तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. पांडे पेडगावचा भुईकोट असे त्याचे त्या वेळचे नाव होते. औरंगजेबचा दुजे भाऊ बहादुर खान कोकालताश हा या किल्ल्याचा त्यावेळी किल्लेदार होता. तो स्वतःला दक्षिणेचा शहंशा समजत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक नुकताच पार पडला होता. त्यावेळी अमाप खर्चही झाला होता तो खर्च भरून काढायला बहादूर खानने स्वतःहून शिवाजी राजांना संधी दिली.बहादूर खानने गडामध्ये एक कोटीचा शाही खजाना आणि 200 उत्तम प्रकारचे घोडे औरंगजेबाकडे पाठवण्यासाठी गोळा केले होते. महाराजांनी आपल्या सरदाराबरोबर आपल्या सैन्याचे नऊ हजाराचे सैन्य बहादूरगडावर खजाना आणण्यासाठी पाठवले या सरदारने आपल्या सैन्याचे दोन भाग केले एक 2000 व एक सात हजाराचा दोन हजाराच्या तुकडीचे गडावर जोरदार हल्ला केला या तुकडीचा उद्देश गडबड उडवून देण्याचा होता. तो सफल झाला बहादुर खान लढाईसाठी तयारी करून मराठ्यांच्या सैन्यावर धावून गेलं. त्यावेळी मराठ्यांच्या तुकडीने माघार घेऊन पळायला सुरुवात केली त्यामुळे अजून जास्त चेव चढला. त्याने मराठ्यांना गाठण्यासाठी त्यांचा जोरदार पाठलाग सुरू केला. मराठ्यांनी बहादुर खाणला हुलकावणी देत खूप लांब वर आणून सोडले. दरम्यान मराठ्यांचा उरलेल्या सात हजार सैन्याने बहादूरगडावर हल्ला चढवला गडामध्ये तुरळक सैन्य नोकर उरले होते. मराठ्यांनी खजिना आणि घोडे ताब्यात घेऊन रायगड कडे कुछ केली. बहादुर खान पाठलाग वरून परत आला. तेव्हा त्याला मराठ्यांनी शाही खजिना लुटण्याची बातमी कळली. तेव्हा त्याला मराठ्यांच्या बहादुरीची खरी जाणीव झाली.
बहादूरगड पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे.
वर्णन
हा किल्ला आयताकृती आकाराचा आहे. या किल्ल्याला आठ प्रवेशद्वारे आहेत. गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे तर नदीच्या दिशेला असलेला दरवाजा मोडकळीस आलेला आहे.सध्या टीम धर्मवीरगडच्या माध्यमातून त्याचे संवर्धन सुरू आहे. किल्ल्याच्या आत ५ फूट (१.५ मी) उंचीचा हनुमानाचा पुतळा आहे. या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या ६ मंदिरांचा गट आहे. हेमाडपंती मंदिरे बालेश्वर, लक्ष्मी-नारायण, मल्लिकार्जुन, रामेश्वर, पाताळेश्वर आणि भैरवनाथ यांची आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक वीर दगड, सतीगल, तोफांचे गोळे, दीपमाळ आणि शिव मूर्ती आहेत.
इतिहास
या किल्ल्याचा फार कमी इतिहास सर्वांना माहित आहे. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी बहादूरखान याने जलवाहिनी बांधली. यावरील मोट आणि पर्शियन चाक आजही शाबूत आहेत. बहादूरखानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले. यानंतर त्याच्या विरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या सोबत होते अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इ. या पेडगाव मोहिमेचा खरा उद्देश होता तो त्या बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता त्याच्याकडून परत आणायचे त्यात होता मोरगावचा मयुरेश्वर, कुरकुंभ गावची ग्रामदेवी फिरंगाईदेवी, आणि अनेक मंदिरांचे कळस इ. या मोहिमेत सरसेनापतींनी ९,००० सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत त्यांनी २,००० सेना आणि बाकिची ७,००० सेना ही येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती, त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता तो असा बहादूरगडच्या मुख्य दरवाजावर त्यांची ७,००० सेना उभी केली आणि त्यांना आदेश दिला कि बहादूरखानाची सेना आली तर उल्ट जंगलात पळायच म्हणजे इकडे त्यांना देव परत आणायला वेळ मिळेल आणि अशाप्रकारे हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहिम फत्ते झाली. आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले.
पेडगावाच्या वस्तीतून थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारा पर्यंत खाजगी वहानाने जाता येते. प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला हनुमानाची ४ फ़ुटी मुर्ती एका देवळीत ठेवलेली आहे. मुर्तीच्या पायाखाली पनवती आहे. याठिकाणी एक छोटी गणेश मुर्ती आहे. गावत किंवा किल्ल्यात सापडलेल्या एखाद्या समाधी वरील दगडाअवर कोरलेली पावले आणि छोट्या पिंडी येथे ठेवलेल्या आहेत. किल्ल्याचे गावाकडील प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. भव्य प्रवेशव्दाराची कमान शाबूत आहे. प्रवेशव्दाराच्या बाजूचे बुरुज मात्र ढासळलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आहे. हे मंदिर गावकर्यांच्या ताब्यात असल्याने जून्या मंदिरावर नवा सिमेंत कॉंक्रीटचा कळस चढवलेला आहे. मंदिराला आणि कळसाला ऑईलपेंटने रंगवून त्याची मुळ शोभा घालवून टाकलेली आहे. मूळ मंदिर यादवकालिन असून दगडात बांधलेले आहे. मंदिराची ओसरी, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे. ओसरी २ खांब २ अर्ध खांभांवर तोललेली आहे. ओसरीत डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून हनुमानाची ३ फ़ूटी मुर्ती आणि गणपतीची दोन फ़ुटी मुर्ती आहे. सभामंडप ४ पूर्ण खांब आणि ४ अर्धखांबांवर तोललेला आहे. गर्भगृहात पिंड आहे. मंदिरा समोरील दिपमाळे खाली अनेक जुन्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यात उमा महेश्वर, विष्णू, सर्पशिळा सतीचा हात, समाधीचे दगड, कोरीव दगड, दोन स्त्रीयांचे मुख कोरलेले एक दगड इत्यादी पाहायला मिळतात. दिपमाळे समोरील पायऱ्या उतरुन खाली उतरल्यावर गजलक्ष्मीची ३ फ़ुटी मुर्ती आहे.
पायवाटेने थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिराचा कळस कोसळलेला आहे. छत कसेबसे उभे आहे. मंदिराचा सभामंडप २ खांबावर तोललेला आहे . मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिराच्या पुढे दारु कोठाराची भग्न इमारत आहे.
दारु कोठार पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिर आहे. हे मंदिर त्रिदल प्रकारातले असून त्याला एक मुख्य गर्भगृह व उजव्या आणि डाव्या बाजूला दोन छोटी गर्भगृहे आहेत. सभामंडप चार मुख्य खांबावर व चार अर्ध खांबावर तोललेले आहे. गर्भगृहात पिंड आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीला टेकून एक गणेशाची ३ फुटी मूर्ती ठेवलेली आहे, तर उजव्या बाजूला एक ३ जैन तिर्थंकरांची मुर्ती आहे. अंतराळाच्या भिंतीला एक गणेशाची २ ५ फुटी मुर्ती टेकून ठेवलेली आहे. बाकीची दोन गर्भगृहे रिकामी आहेत . सभामंडपातील रंगशीळा तोडलेली आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर वरच्या बाजूला दोन बाजूला मूर्ती आहेत, पण त्या झिजलेल्या असल्याने ओळखता येत नाहीत. त्यातील उजव्या बाजूची मूर्ती नरसिंहाची असावी. मंदिरासमोर फ़ुलझाडे लावलेली आहेत. मंदिराचा कळस कोसळलेला आहे.
रामेश्वर मंदिरा जवळ एक वीटांनी बांधलेला ६ फ़ूटी पोकळ मनोरा आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या भिमा नदीतले पाणी किल्ल्यावर खापरांच्या पाईपांमधून खेळवण्यात आले आहे. या पाईपातून जाणार्या पाण्यातील हवा बाहेर निघून जाण्यासाठी मनोरे (Air release Valves) बांधण्यात आलेले आहेत. अशाप्रकारचे दोन मनोरे किल्ल्यात आहेत. त्यांना उच्छवास म्हणतात. दुसरा मनोरा ओलांडून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मधोमध एक ३० फ़ूट उंच बुरुजासारखी रचना दिसते. त्यावर जाण्यासाठी मातीचा उतार बनवलेला आहे. हा बुरुज नसून हत्ती मोट आहे. या मोटे खाली एक हौद आहे. वरच्या टोकाला भिंतीत दोन मोठी भोके असलेले दगद बसवलेले आहेत. या भोकातून लाकडाचा भक्कम वासा टाकून त्यावर कप्पी बसवून हत्ती / घोडे/ बैलाच्या सहाय्याने पाणी वर खेचून घेतले जात असे. या हौदापर्यंत पाणी आणण्यासाठी नदी जवळ अशाप्रकारची दुसरी ५० फ़ूट उंचीची मोट बांधलेली पाहायला मिळते.
या दोन्ही मोटा पाहून झाल्यावर उजव्या बाजूला असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराकडे जावे. हे किल्ल्यावरील अप्रतिम मंदिर आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पश्चिमेकडे असून उत्तर आणि दक्षिण दिशेलाही प्रवेशव्दार आहेत. प्रवेशव्दारांच्या व्दारशाल्हांवर आणि पट्टीवर सुंदर क्प्रीवकाम आहे. तिन्ही प्रवेशव्दारांच्या बाजूच्या भिंतींवर सुंदर गवाक्ष कोरलेली आहेत. मंदिराच्या बाह्यभिंतींवर सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. देवकोष्ठकात दक्षिण दिशेला वराहाची, पूर्वेला विष्णूची मुर्ती आहे. उत्तरेच्या देवकोष्ठकातील मुर्ती ओळखंण्याच्या पलिकडे झिजलेली आहे. मंदिराचा सभामंडप १२ खांबावर तोललेले आहे. सभामंडपावरील कळस ४ खांबावर तोललेला आहे. कळसाच्या आतील भागावर कमळ कोरलेले आहे. त्याच्या चारही कोपर्यात व्यालमुख आहेत. अंतराळाच्या छतावरही अशाच प्रकारचे कोरीव काम आहे. सभामंडपाच्या खांबांवर मुर्ती आणि इतर कोरीवकाम आहे. मंदिराच्या गाभार्याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्यात लक्ष्मी नारायणाची मुर्ती नसून एक वीरगख ठेवलेली आहे. लक्ष्मी नारायण मंदिरासमोर बालेश्वर मंदिर आहे. मंदिराचा सभमंडप कोसळलेला आहे. पण खांब उभे आहेत. खांबांवर मुर्ती आणि इतर कोरीवकाम आहे. गाभार्याच्या दरवाजावर व्याल, गंधर्व, वेलबुट्टी यांचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. गाभार्यात पिंड आहे.